आरोग्यदायी हृदयासाठी ‘पुरेशी’ झोप आवश्यक

रोज जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर आताच सावधान व्हा, असा इशारा नुकत्याच करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनात देण्यात आला आहे. झोप आणि हृदयासंबंधीचे आजार यांच्यात अगदी जवळचा संबंध आहे. जे लोक पुरेशी झोप घेत नाहीत, त्यांना हृदयासंबंधीचा आजार होण्याची जास्त शक्यता असते. हे आजार कार्डिओवेस्कूलर आणि कोरोनरीशी संबंधित असतात. जर या आजाराचा धोका कमी करावयाचा असेल तर पुरेशी झोप महत्त्वाची ठरते, असे संशोधकांनी म्हटले आहे.

संशोधकांच्या मते, कमी झोप घेतल्याने आरोग्य आणि शरीरातील जैविक प्रक्रियांवर त्याचा परिणाम होतो. यामुळे ग्लुकोजच्या पचनात अडचण निर्माण होते. याशिवाय रक्तदाब कमी-जास्त होऊ शकतो. तर काहीवेळा शरीराला सूज येते.

तसेच अपुर्‍या झोपेमुळे प्रसंगी रक्तदाब वाढू शकतो. तसेच हृदयाची धडधडही वाढते. मात्र, कधी कधी प्रमाणापेक्षा जास्त झोप घेतल्यानेही अशा समस्या निर्माण होऊ शकतात. ज्यावेळी आम्ही झोपेत असतो त्यावेळी रक्तदाब सामान्य असतो. मात्र, पुरेशी झोप झाली नाही तर रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.

आरोग्यदायी शरीरासाठी नेमकी किती झोप आवश्यक आहे, असा प्रश्न येेथे उपस्थित होतो. संशोधकांच्या मते रोज किमान सात ते आठ तास झोप शरीरासाठी पुरेशी ठरते. मात्र, जे लोक पाच तासांहून कमी झोप घेतात, त्यांना हृदयविकार होण्याची शक्यता असते.